एक्स रे : गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी लटकणार
रतिंद्र नाईक
गणेशचतुर्थीला दरवर्षी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. कोकण रेल्वेने जाणार्या प्रवाशांची संख्या यात सर्वाधिक असते. मात्र अपुर्या गाड्या, एकेरी मार्ग आणि प्रवाशांची संख्या पाहता यंदाही कोकण रेल्वेचा पुरता बोजवारा उडणार आहे. कोकण रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे एकेरी मार्गावर रेल्वे गाड्यांचे टॅ्रफिक जाम होणार असून चाकरमान्यांना वेळेत कोकणात पोहोचवताना रेल्वे प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहेत. त्यातच नेहमी फुल्ल असणार्या कोकण रेल्वेची कन्फर्म तिकिटे गणेशोत्सवात मिळणे तसे कठीणच. मात्र हातात कन्फर्म तिकीट असतानाही गर्दीचा सामना करीत डब्यात जागा मिळविताना चाकरमान्यांचा ‘बाप्पा मोरया’ होणार आहे.
गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असून लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी कुटुुंबकबिल्यासह कोकणात दरवर्षी जातात. त्यासाठी चार महिने अगोदरच मुंबईतल्या तिकीट खिडक्यांवर रांगा लावून असंख्य प्रवाशांनी रिझर्व्हेशन केले. मात्र अपुर्या गाड्यांमुळे अनेकांच्या हाती वेटिंग लिस्टचेच तिकीट हाती पडले. रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालविण्यात येतात. यंदाही या विशेष गाड्या कोकण रेल्वेमार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी या गाड्याही अपुर्या पडणार आहेत. त्यातच आरक्षण असूनही चतुर्थीच्या काळात कोकणात जाणार्या प्रवाशांना हक्काच्या सीटसाठीही घुसखोरी करणार्या प्रवाशांशी दरवर्षीच वाद घालावा लागतो. कारण खेड, चिपळूण, रत्नागिरीतील प्रवासीच आरक्षित डब्यात घुसखोरी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कोकण रेल्वे प्रशासनाने तोडगा काढल्यास आगामी काळात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.
कन्फर्म तिकिटाची फक्त घोषणाच
प्रवाशांना १ जुलैपासून वेटिंग नव्हे तर कन्फर्म तिकीटच हाती मिळेल तसेच शताब्दी व राजधानी गाड्यांचे डबेही वाढविण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेतर्फे करण्यात आली होती, मात्र १ जुलैनंतर तिकीट काढूनही हाती वेटिंग लिस्टचेच तिकीट पडल्याने रेल्वेकडून कन्फर्म तिकिटाची ती फक्त घोषणाच असल्याची चर्चा चाकरमानी करीत आहेत.
कन्फर्म तिकीट मिळूनही…
रेल्वे तिकीट कन्फर्म मिळूनही आरक्षित डब्यात दरवर्षीच प्रवासी घुसखोरी करतात. या घुसखोर प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवासी हे रत्नागिरीतील असतात. रेल्वे पोलीसही या घुसखोर प्रवाशांकडे दुर्लक्ष करीत असल्याने घुसखोर प्रवाशांचे फावते.
गेल्या वर्षी फक्त २४४ गाड्या
कोकण रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षी केवळ २४४ गाड्या गणेशोत्सवात सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये डबलडेकर गाडीच्या २८ फेर्या चालविण्यात आल्या, तर पनवेल-चिपळूण डेमूही गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात आली होती. मात्र तरीही गेल्या वर्षी प्रवाशांना गर्दीतूनच कोकण गाठावे लागले होते.
स्पेशल गाड्यांचा स्पेशल दर
गणपती स्पेशल गाड्यांचा तिकीट दरही स्पेशल असून या स्पेशल गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दररोज कोकणात जाणार्या एक्स्प्रेस गाड्यांचा स्लीपर क्लासचा दादर ते कुडाळ दर ३४० रुपये आहे, तर गणपती स्पेशल गाड्यांचा पनवेल ते कुडाळ हा दर ४०५ रुपये इतका आहे. त्यामुळे गणपती स्पेशल गाड्यांतून प्रवास करणार्या प्रवाशांना अतिरिक्त पैसे भरून तिकीट घ्यावे लागणार आहे.
जनशताब्दी, कोकणकन्या ४०० वेटिंग
मुंबईतून दररोज कोकणात जाणार्या जनशताब्दी, मांडवी, कोकणकन्या, राज्यराणी या एक्स्प्रेस गाड्या चार महिन्यांअगोदरच फुल झाल्या असून ३ ते ८ सप्टेंबरपर्यंत या गाड्यांचे शयनयान श्रेणीचे ४०० हून अधिक वेटिंग आहे तर जनशताब्दी, राज्यराणी, कोकणकन्या या गाड्यांच्या स्लीपर क्लासच्या तिकीटची विक्री बंद करण्यात आली आहे.
गर्दीवर अतिरिक्त डब्यांचा उतारा
प्रवाशांची वाढती गर्दी पाहता गाड्यांची संख्या वाढविण्याऐवजी कोकण रेल्वेने गर्दीवर अतिरिक्त डब्यांचा उतारा शोधला आहे. गाडी क्र. ०९००९ मुंबई सेंट्रल ते करमाळी गाडीला दोन स्लीपर तसेच गाडी क्र. ०९४१८ अहमदाबाद ते करमाळी गाडीला एक स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे.
एकेरी मार्ग आणि गाड्यांचे ट्रॅफिक जाम
कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण न झाल्याने एकाच मार्गावर ताण पडणार आहे. नियमित गाड्या तसेच अतिरिक्त गाड्यांची भर पडणार असल्याने या मार्गावर ट्रॅफिक जाम होणार आहे. तसेच चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचायला १५ ते २० तास लागणार आहेत.
– कोकण रेल्वेमार्गावर गेल्या वर्षी २४४ फेर्या चालविण्यात आल्या, तर यंदा २३६ फेर्या चालविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठी आणखी गाड्या सोडण्यासंदर्भात अभ्यास सुरू असून नियोजनानंतरच शक्य असल्यास गाड्या सोडण्यात येतील.
एल. के. वर्मा, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे
– गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्या गाड्यांच्या संख्येत आणखी वाढ करण्यात आली पाहिजे. दरवर्षीच गर्दीत चिरडून प्रवास करावा लागतो. रेल्वेने दोन दिवस अगोदर जादा गाड्या सोडण्यावर भर द्यायला हवा. तसेच गणपती स्पेशल गाड्यांचे तिकीटही नियमित एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच ठेवावे.
अमित मोरे, कोकण रेल्वे प्रवासी