मुंबई ही सोन्या चे अंडे देनारी कोमडी आहे काय?

मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे पूर्वी म्हटले जात असल्याचा उल्लेख छगन भुजबळ यांनी करताच, भाजप व शिंदे गटातील लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावल्या. बॅकबे रेक्लमेशन घोटाळ्यापासून मुंबई ही कोंबडी सोन्याची असल्याचे मानले जाऊ लागले.
त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारवर भूखंड गैरव्यवहाराचे आरोप झाले.

पवारांवर भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याचा आरोप, तेव्हा शिवसेनेत असलेल्या छगन भुजबळ यांनीच केला होता! विलासराव देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या संस्थेला भूखंड वाटप केल्याचा आरोप झाला होता. मुंबईतील गिरणीमालकांवर जमिनीबाबतची कृपा, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतच झाली होती. अंतुले यांचे बिल्डरशी संबंध असल्याचे प्रकरण गाजले होते. मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्रीपद त्यांच्या जावयाने केलेल्या अशाच एका भानगडीमुळे गेले.

महाराष्ट्रातील आणखी एका अत्यंत वादग्रस्त अशा माजी मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात कोणते भूखंड आहेत, याचीही चर्चा झाली होती. नीतिमान अशा फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरदेखील मुंबईत नव्हे, तर नवी मुंबईत 1700 कोटी रुपयांचा सिडको घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांची नावेही या संदर्भात आली होती. अर्थात फडणवीस यांनी त्याचे लगोलग खंडनही केले होते. असो.


कोंबडी’ हा शब्द महाराष्ट्रात खूप गाजला आहे. ‘कोंबडी चोर’ असा उल्लेख करून, त्याचाही राजकारणात पुरेपूर वापर झाला आहे. ‘कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालाया लागली’ हे गाणे अतिशय लोकप्रिय आहे. अधिवेशनकाळात नागपुरात कोंबडी खाण्याचा आनंद लोक घेत असतातच.

परंतु राजकारण्यांना सोन्याच्या कोंबडीचे अधिक आकर्षण आहे. आकर्षण असतेच, पण असे जाहीरपणे बोलले की, काही मंडळींचे काळीज विदीर्ण होते… ज्यांच्या भावना दुखावल्या, त्यांच्या बाजूलाही मंगलप्रसाद लोढा नावाचे बिल्डर असलेले मंत्रिमहोदय आहेतच. राजकारणात असल्यामुळे त्यांचा व्यवसायात अधिक उत्कर्ष झाला काय, याविषयी ज्यांना कोणाला संशोधन करायचे आहे, ते करू शकतात. पण सवलतीत वा फुकटात जमिनी लाटायच्या हा उद्योग केवळ मुंबईतच नव्हे, तर सर्व महाराष्ट्रात आणि देशात अनेक दशके जोरात सुरू आहे. परंतु तरीही मुंबईला सोन्याची कोंबडी म्हटले, तर लगेच भावना दुखावू शकतात बरे. भावनाओंको समझो यार!.

संवाद
हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT