मीना कुमारी चा टेनिस कोच , केव्हा ही रिहर्सल करत नसे,हीरो पेक्शा जास्त कमाई करत होता ,अशी महमूद ची ख्याति आहे.
मेहमूद हा माझा अत्यंत लाडका अभिनेता. मात्र स्वतःला तो ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणवून घ्यायचा. ‘मेमसाब’ या चित्रपटात त्याने प्रदीपकुमारची नक्कल केली होती. पृथ्वीराज कपूर वगैरेंच्याही नकला केल्या.
परंतु काहीवेळा रोलची गरज म्हणून त्याने जाणीवपूर्वक नकला केल्या. मेहमूद प्रथम ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होता. गुरुदत्तने त्याला वर आणले. त्याच्या ‘प्यासा’ या चित्रपटात तो होताच. त्यात तो बंगाली स्टाइलमध्ये बोलतो आणि ते योग्यच होते. कारण कॅरेक्टरच तसे होते,
पण त्याचे त्या चित्रपटातील बाकीचे भाऊ बंगाली लहेजात हिंदी बोलत नाहीत. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मेहमूदने ही त्रुटी गुरुदत्तला दाखवूनही दिली होती, पण ती तशीच कायम ठेवण्यात आली. मेहमूद नाचायचा उत्तम. ही कला तो वडिलांकडून, मुमताज अलींकडून शिकला. चित्रपटात येण्यापूर्वी मेहमूद मीनाकुमारीचा टेनिस कोच होता. प्रसिद्ध दिग्दर्शक पी एल संतोषी यांचा ड्रायव्हर म्हणूनही त्याने काम केले. पुढे मेहमूदने मीनाकुमारीची बहीण मधूशी लग्न केले.
मधू ला घटस्फोट दिल्यानंतर काही काळ अरुणा इराणी त्याच्या आयुष्यात आली. मेहमूद जेव्हा सेटवर डायलॉग म्हणायचा, तेव्हा टेकनंतर आपोआप सेटवरच टाळ्या वाजायच्या! मेहमूद कधीही रिहर्सल वगैरे करायचा नाही.
अनेक चित्रपटांत हीरोपेक्षा त्याला जास्त पैसे मिळत. चित्रपटात मेहमूद असला की हीरो अस्वस्थ होत असत. मेहमूद प्रथम बॉम्बे टॉकीजच्या ‘किस्मत’ मध्ये बालकलाकार म्हणून दिसला. पी एल संतोषीचा मुलगा राजकुमार संतोषीने ‘अंदाज अपना अपना’ बनवला, तेव्हा त्यात त्याने मेहमूदसाठी वाह वाह प्राॅडक्शनच्या निर्मात्याची व्यक्तिरेखा लिहिली. मेहमूद तामिळ होता. त्याचे आजोबा कर्नाटकमधील नवाब होते.
त्यामुळे त्याच्या बोलण्यात दक्षिणी लहेजा सहजपणे यायचा. हैदराबादी उर्दू ढंगात तो धमाल करायचा. अमिताभने एका चित्रपटात मेहमूदची हैदराबादी ढंगात नक्कल केली आहे.
मेहमूद जेव्हा चित्रपट क्षेत्रात धडपडत होता, तेव्हा त्याची किशोरकुमारशी दोस्ती झाली. एक दिवस मी चित्रपटनिर्मिती करीन, तेव्हा तुला त्यात घेईन, असे मेहमूद म्हणाला आणि त्याप्रमाणे ‘पडोसन’ मध्ये त्याने किशोरला घेतले. एकदा मेहमूद म्हणाला होता की, एक मोठा कलावंत नेहमी प्रत्येक चित्रपटात गेटअप बदलत असतो, ते त्याला खूप आवडते, पण आपल्या आवाजात काही तो बदल करत नाही!
त्याने नाव घेतले नाही, पण त्याला प्राणबद्दलच असे म्हणायचे होते. मेहमूदने ‘बॉम्बे टू गोवा’ बनवला, तेव्हा त्यात अमिताभला एका गाण्यावर नाचायचे होते. मला नाचता येणार नाही म्हणून अमिताभ आपल्या रूमवर रुसून बसला होता! त्यावेळी मेहमूदने त्याची समजूत काढली आणि हुशारीने त्याच्याकडून डान्स करून घेतला.
अमिताभला जेव्हा भेटण्याचा मला योग आला, तेव्हा त्याने आवर्जून सांगितले होते की, हिंदीत मेहमूद आणि दक्षिणेत नागेश हे त्याचे आवडते कॉमेडियन्स आहेत. पण मी मेहमूदला ‘कॉमेडियन’ ऐवजी ‘उत्कृष्ट अभिनेता’ असेच संबोधणे पसंत करतो. कारण तो हाडाचा अभिनेता होता.
लाखों में एक, मस्ताना, कुंवारा बाप, मैं सुंदर हूँ अशा कितीतरी चित्रपटांत त्याने हलवून सोडले आहे. तरतर्हेचे चेहरे करणे, आवाज काढणे, हेल काढणे, शरीर वाटेल तसे वाकवणे, घुसळणे, हलवणे, डोळे आणि भुवया यांच्या हालचालीतून जे हवे ते सांगणे, हे सर्व काही त्याने केले. मेहमूद उत्तम नर्तक असल्यामुळे त्याच्या अभिनयात सतत नर्तक दिसतो.
‘मुत्तो कोडी कव्वाडी हडा’ यासारखी गाणी त्याने अफलातूनपणे म्हटली आहेत. शम्मी कपूरच्या ‘प्रितम’ नावाच्या चित्रपटात त्याने न्हाव्याचे अफलातून काम केले आहे. माझ्या आठवणीप्रमाणे त्याचे नावच ‘सफाचट’ असते. मेहमूद पडद्यावर अक्षरशः सुटायचचा! त्याला नियंत्रणात ठेवायचे म्हणजे दिग्दर्शकापुढचे दिव्यच असे! मेहमूदला संगीताची उत्तम जाण होती, जशी ती राज कपूरला होती.
गुरूदत्त, राज, आरडी, किशोर यांच्याशी त्याची यारी होती. सगळेजण गुणी, अष्टपैलू. ‘भूतबंगला’ मध्ये मेहमूदने आरडीकडून चक्क अभिनय करून घेतला! चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, लेखन हे सर्व त्याला येत होते. मेहमूदचे इंग्रजी चांगले होते आणि उत्तम इंग्रजी चित्रपट बघण्याची त्याला आवड होती. मेहमूदने कुठून कुठवर प्रगती केली बघा!
अनेक चित्रपटांत त्याने साधू, बुवा, बैरागी, धर्मभोळ्या माणसाचे काम केले. तेव्हा हा माणूस मुसलमान आहे असे वाटायचेच नाही… जसे जागीरदार ‘शेजारी’ मध्ये अस्सल मुसलमान वाटले! खरोखरच मेहमूद लाखों में एक होता. आज मेहमूदचा जन्मदिन. त्याला अभिवादन!-
साभार
हेमंत देसाई