46वर्षा नंतर दिलीप कुमार चा सगीना महातो बघीतला त्यां बद्दल कही विशेष
प्रतिनिधि
हेमंत देसाई
काल जवळपास सेहेचाळीस वर्षानंतर दिलीपकुमारचा ‘सगीना महातो’ बघितला. 1974 मध्ये पुण्याच्या राहुल सिनेमात मी तो बघितला होता. त्यापूर्वी 1970 साली दिग्दर्शक तपन सिन्हांनी तो बंगालीत आणला होता. बंगालीत देखील दिलीपनेच काम केले होते. गौरकिशोर घोष यांची कथा.
ते कादंबरीकार नि विख्यात पत्रकार. पुलंचे मित्र. चित्रपटाचा विशेष म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळातील पार्श्वभूमी. कथेत फॅसिझम, मार्क्सवाद, समाजवाद, कामगारलढे यांचे संदर्भ आहेत. मालक विरुद्ध कामगार असा विषय. कामगारांशी द्रोह करणारा कामगार नेता आणि त्यांच्याशी बांधिलकी असलेला नायक, असा मुख्य धागा आहे. ‘सगीना’ची हिंदी आवृत्ती विशेष प्रभावी नव्हती.
बंगाली मात्र परिणामकारक होता. दिलीपकुमारने बंगाली व हिंदी अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये काम केले. सुमारे तीस वर्षांपूर्वी मी सिलिगुढीला गेलो होतो आणि बावीस वर्षांपूर्वी सिक्कीम आणि दार्जिलिंगला गेलो होतो. ‘सगीना’चे शूटिंग त्याच परिसरात झाले आहे. त्यामुळे तेथे गेलो असताना ‘सगीना’ची पुन्हा आठवण झाली. या चित्रपटात एका दृश्यात दार्जिलिंगची ती सुप्रसिद्ध रेल्वेगाडी धावत असते आणि त्याच्याबरोबर दिलीपकुमारही अत्यानंदाने, चित्कार काढत धावत असतो.
हा सीन करताना ‘तू तुझे मेथड ॲक्टिंग बाजूला ठेव’ असे तपनबाबूंनी दिलीपला सांगितले होते. आणि त्यानेही त्यांच्या सूचनेनुसार एका टेकमध्ये हे दृश्य दिले होते. ते बघून तपबाबूंनी ‘वेल डन युसूफ’ म्हणून त्याची पाठ थोपटली होती! दिलीपच्या मनात बंगालबद्दल एक हळवा कोपरा होता. याचे कारण, दिलीप म्हणजे खरे तर विख्यात दिग्दर्शक अमिया चक्रवर्तींची(ज्वारभाटा) डिस्कव्हरी. नंतर बिमल रॉय, नितीन बोस, हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांतही त्याने काम केले. या सर्वांच्या सहवासामुळे दिलीपकुमार बंकिमचंद्र, रवींद्रनाथ तसेच शरदबाबूंच्या साहित्याकडे ओढला गेला. शिवाय त्याने बंगाली भाषा शिकून, त्यातले उच्चारांचे बारकावे देखील आत्मसात केले. प्रसिद्ध कादंबरीकार आणि पटकथालेखक नबेंदू घोष यांच्याकडून ते शिकून घेतले.
ते बॉम्बे टॉकिजमध्ये होते आणि दिलीपदेखील. घोषबाबूंना पस्तीस वर्षांपूर्वी मी भेटून, त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. 1963 साली ‘पारी’ या चित्रपटाद्वारे दिलीपने प्रथम बंगाली चित्रपटामध्ये काम केले. त्यामध्ये दिलीप, धर्मेंद्र, अभी भट्टाचार्य होते. ‘पारी’ हा चित्रपट प्रसिद्ध साहित्यिक जरासंध यांच्या कथेवर आधारलेला होता. त्यामध्ये दिलीपकुमारने जेलर विजय उपाध्यायची भूमिका केली होती.
‘देवदास’ करण्यापूर्वी दिलीपने प्रमथेश बरुआचा ‘देवदास’ पाहिला नव्हता. मात्र शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने तो बघितला, तेव्हा ‘प्रमथेशचे काम माझ्यापेक्षा जास्त चांगले वठले आहे’ असे उद्गार त्याने काढले. दिलीपकुमारला सत्यजित राय यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. ‘फूटपाथ’ आणि ‘मधुमती’ या चित्रपटांच्या प्रीमियर शोला छबी विश्वास, पहाडी संन्याल आणि अजय कार आले होते.
तेव्हा दिलीपने त्यांचे अत्यानंदाने स्वागत केले होते. तो प्रसंग अनेकांच्या लक्षात आहे. त्याची छायाचित्रे बघूनच, त्याक्षणी आपण तेथे उपस्थित का नव्हतो? असे मला वाटायचे. अजूनही वाटते… उत्तमकुमार हा बंगालमधील सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे, असे दिलीपचे मत होते.
मी सर्वश्रेष्ठ, सगळीकडे मीच, मीच मोठा, माझ्यासारखा मीच, माझा विजय असो!’ असे आज प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या विविध क्षेत्रांतील अनेक सुमार लोकांना वाटत असते. मात्र या ‘कोहिनूर’चा स्वभाव आणि शैलीच वेगळी. म्हणून तर दिलीपकुमार सगळ्यांत उठून दिसतो. त्याला सलाम!-