29वर्ष पूर्वी 5मार्च1995 रोजी जलाल आगा जग सोडून गला आज त्याची पुण्य तिथि आहे

मुंबई

विशेष
प्रतिनिधि

बरोबर २९ वर्षांपूर्वी, म्हणजे 5 मार्च 1995 रोजी जलाल आगा वारला. ते काही त्याचं जाण्याचं वय नव्हतं. तेव्हा तो होता केवळ 49-50 वर्षांचा. मुंबईत त्याला मी वरळीला ग्रोव्हर ऑडिटोरियममध्ये प्रायोगिक सिनेमे पाहायला जायचो, तिथे पाहिलं होतं.
तसंच नेहरू सेंटरच्या समोरच्या रस्त्यावर डिव्हायडरवर बसून, गाॅगल लावून सिगारेट ओढतानाही पाहिलं होतं. त्याचप्रमाणे मरीन ड्राइव्हवर फिरताना देखील. दिसायला तो अत्यंत हँडसम होता.

पुण्यात तो फिल्म इन्स्टिट्यूटला शिकायला होता आणि लॉ कॉलेज रोडवर देखील त्याला पाहिल्याचं आठवतं. पण तेव्हा तो कोण होता हे माहिती नव्हतं. जलालने ‘मुगले आझम’ या चित्रपटात लहान जहांगीरची भूमिका केली होती. मीनाकुमारीच्या ‘मझली दीदी’ मध्ये त्याला पाहिल्याचं आठवतं. बम्बई रात की बाहों में, सारा आकाश, बॉम्बे टॉकी या चित्रपटांत त्याने लक्षवेधी भूमिका केल्या. ‘सात हिंदुस्तानी’मध्ये तो अमिताभ बच्चनबरोबर दिसला. मीनाकुमारीच्या, सावनकुमार टाक निर्देशित ‘गोमती के किनारे’ या चित्रपटातील त्याचं धोब्याचं काम लक्षात राहिलं. “गरम हवा’ मधील त्याचा शमशाद ठसला होता. जलालचा ‘शोले’ सगळ्यांनाच माहिती आहे. पण गमन, जुनून दूरियाँ, नौकर, कथा या चित्रपटांतही तो दिसला. ‘बात बन जाये’ हा एक उत्पल दत्तचा धमाल चित्रपट आहे. त्यामध्ये ॲडव्होकेट भारत सिन्हाच्या भूमिकेत जलाल होता.

अलीकडे ज्यांचे निधन झाले, त्या प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार शहानींच्या ‘तरंग’मध्येही जलाल आगाची छोटी भूमिका होती. जलालची बहीण म्हणजे शाही आगा. ती मेहमूदचा धाकटा भाऊ शौकतची पत्नी. जलालचा मेव्हणा म्हणजे टिनू आनंद. टिनूलाही ‘सात हिंदुस्तानी’ मध्ये भूमिका करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु त्याचवेळी त्याला सत्यजित राय यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शकाचे काम मिळाल्यामुळे, त्याने ही ऑफर नाकारली. ‘सात हिंदुस्तानी’ ची कॉस्च्यूम डिझायनर म्हणजे शहनाज वाहनवटी. ती दिवाना, पत्थर के इंसान वगैरे चित्रपटांत अभिनय करताना दिसली आहे. ती जलालची बहीण. जलालचा मुलगा म्हणजे सलीम खिस्तोफर. तो सुप्रसिद्ध कुक आहे. गोव्यात त्याचं रेस्तराँ आहे .
जलालची बहीण शाही हिने 1975 सालच्या ‘मृगतृष्णा’मध्ये काम केलं होतं. जलालची दुसरी बहिण शाहूर पॉंड्स,नेसकॅफेची मॉडेल म्हणून आपल्याला ठाऊक आहे.

जलालला एक हॉलीवूडचा चित्रपटही मिळाला होता. त्याचं नाव ‘द क्रॉसिंग’. पण तो पूर्ण झाला नाही. जितेंद्रचा ‘फर्ज’ हा चित्रपट प्रथम जलालला ऑफर झाला होता. परंतु वडिलांच्या शिफारशीमुळे तो आपल्याला मिळाला, हे कळल्यावर त्याने तो नाकारला. जलाल नायक म्हणून यशस्वी झाला नाही. परंतु छोट्या छोट्या भूमिकांमध्ये तो दिसत राहिला.

फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊनही, त्याला चांगले रोल्स मिळाले नाहीत. ‘ज्यूली’ सारख्या मोजक्याच चित्रपटांत त्याला चांगल्या भूमिका मिळाल्या. जलालला लहानपणापासूनच सिनेमाची आवड होती. लहान असताना त्याने ‘मुगले’त काम करावं, यासाठी दिलीपकुमारने आगाला विनंती केली. परंतु पोरवयात मुलाने सिनेमाची वाट वाकडी करू नये, असे बाप म्हणून आगाचं मत होतं. तरीदेखील त्याच्या नकळत दिलीपकुमारने जलालला राजी केलं! आणि लहान जहांगीरचा रोल त्याला दिला.

जलालने अगोदर शिक्षण पूर्ण करावं म्हणून आगाने त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केले होते. परंतु शेवटी जलाल हा सिनेमातच आला! चाळीस एक वर्षांपूर्वी त्याचे वडील आगा एकदा मला पुण्याला जात असताना एशियाड बसमध्ये भेटले होते. आगा त्याच्या पत्नीबरोबर होता. बसमध्ये आगा मोठमोठ्याने हसत, गमती करत होता. सगळ्यांशी गप्पा मारत होता. मध्ये बस बंद पडल्यावर, बसला धक्का देण्यासाठी तो आमच्याबरोबर खाली देखील उतरला होता! मस्तपैकी मराठीत बोलत होता. त्याचा मुलगा जलाल हा हास्य अभिनेता असला, तरीदेखील त्याचं व्यक्तिगत जीवन दुःखी होतं

जलालची पत्नी व्हॅलरी ही मॉडेल होती आणि तिचं आणि त्याचं पटलं नाही. ती मुलांना घेऊन जर्मनीत निघून गेली. मुलांना भेटण्यासाठी जर्मनीत जाता यावं म्हणून जलाल मिळेल ते रोल करत राहिला. पण त्याच्या मुलांच्या फारशा भेटी होत नसत. याचा त्याला त्रास झाला आणि त्याचं अकाली निधन झालं. चटका लावून जाणारच जलाल आगाचं आयुष्य होतं. जलालला आदरांजली!

साभार


हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT