सर्व प्रिय मुन्ना बड़ा प्यारा द ग्रेट किशोर कुमार चा वाढ दिवस निम्मित्ते काही खास पहा

सर्वप्रिय किशोरकुमारचा आज जन्मदिन. लतापेक्षा किशोर वयाने मोठा आहे हे सत्य असले, तरी ते आपल्याला पटतच नाही! म्हणजे किशोर इतका अवखळ होता की, तो हयात असता, तर आज 94 वर्षांचा असता, हे आपल्याला खरेच वाटत नाही

. लताचा जन्म इंदौरचा, तर किशोर खांडव्याचा. किशोरला एकेरी हाक मारण्यात जो आपलेपणा वाटतो, तो ‘अहो जाहो’ करण्यात वाटत नाही. कारण तो ‘मुन्ना बडा प्यारा, अम्मी का दुलारा’ आहे. खरे तर ‘हम सब का दुलारा,’ असेच म्हणायला हवे. किशोर हा कधी म्हातारा माणूस वाटतो का? वाटू शकला असता का? किशोर म्हणजे म्हातारा हा केवळ आभासच, असे मी का म्हणतो कळाले का? कारण किशोरचे खरे नाव ‘आभासकुमार’च आहे ना।

इतर इतकी अनेक प्रकारची गाणी म्हणणाऱ्या किशोरकुमारने, गायनाचे पद्धतशीर शिक्षण घेतले नव्हते. त्याच्या पहिल्या गाण्याचे(जिद्दी) शब्द होते ‘मरने की दुवाएँ क्यूं माँगू’. अभिनेता म्हणून किशोरचा पहिला चित्रपट म्हणजे 1946 सालचा ‘शिकारी’ ‘आके सीधी लगी दिल पे’ या गाण्यात किशोरला प्रथम लता साथ देणार होती.

पण शेवटी किशोरनेच पुरुष व बाईच्या आवाजात हे गाणे गायले आहे! किशोरचे ‘पाँच रुपय्या बारा आना’ हे गाणे खूप गाजले. इंदौरमधील कॉलेज कॅन्टीनचे त्याचे एवढे पैसे एकेकाळी थकले होते ना. या गाण्याचे मूळ तिथले आहे आणि किशोरच्या याॅडलिंगचे मूळ जिम्मी राॅजर्स आणि टेक्स माॅर्टन या विदेशी कंट्री गायकांच्या गाण्यात आहे.

18 फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचा मान किशोरकडे जातो. बप्पी लाहिरी हा किशोरचा भाचा. शब्बीरकुमार आणि बप्पी हे गायला लागले की, त्यांना सैबेरियाला पाठवावे, असा कुविचार माझ्या मनात यायचा! परंतु बप्पीने संगीत दिलेले आणि किशोरने गायलेले ‘पग घुंगरू’ हे गाणे माझे अत्यंत आवडीचे आहे. त्या गाण्यात अमिताभ ला बघणे हा धमाल अनुभव आहे. उत्तर प्रदेशातील लोकगीतांवर आधारलेले ‘हर छोरी रानी यहाँ, हर छोरा राजा’ या गाण्यात किशोर अक्षरश: सुटलाय.. तेही माझे प्यारे गाणे आहे.

तसेच राजेश खन्ना ने निर्माण केलेल्या ‘अलग अलग” या चित्रपटात ‘कभी बेकसी ने मारा’ आणि ‘दिल में आग लगायी’ ही माझी अत्यंत आवडती गाणी आहेत. त्याचप्रमाणे ‘सफर’ मधील ‘जीवन से भरी तेरी आँखें’ या गाण्याचे चित्रणही अप्रतिम. शेवटी असित सेन यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाचा तो चित्रपट. ‘नमकहराम’ मधील वो झूठा है व्होटना उसको देना’ किंवा ‘मेरे अपने’ मधील ‘हालचाल ठीक ठाक है’ या गाण्यात किशोरने राजकीय विषय काय उत्तम पद्धतीने सादर केला आहे.

किशोर आधी सहगलची नक्कल करायचा, परंतु नंतर पाकिस्तानी गायक मोहम्मद रश्दी याच्या प्रभावाखाली तो आला होता. मात्र ‘तू तुझी स्वतःची शैली विकसित कर’ असा सल्ला सचिनदेव बर्मन यांनी त्याला दिला. किशोरने सर्वाधिक गाणी- एकूण 245- राजेश खन्नासाठी गायली. त्यानंतर याबाबतीत जितेंद्र, देव आणि अमिताभचा नंबर लागतो. ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ हा चित्रपट प्रथम मेहमूद आणि किशोरला घेऊन करायचे ठरवले होते. किशोरने अनेक भाषांत गाणी म्हटली आणि मराठीतले त्याचे ‘अश्विनी तू ये ना’ हे गाणे देखील जोशपूर्ण आहे.

किशोर हा हॉलीवूड गायक नट डॅनी केचा फॅन होता. त्याच्या घरी डॅनीची अनेक पोस्टर्स टांगलेली असत. किशोरने अभिनयात कारकीर्द करावी, अशी अशोककुमारची इच्छा होती, पण त्याला गायकच व्हायचे होते. आणि ते बरेच झाले ना! परंतु ‘पडोसन’ मध्ये किशोरचे काम इतके जबरे झाले की, त्याच्यापुढे आपण फिके पडू, म्हणून मेहमूदने त्याचे काही सीन्स कापले होते.

सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’मध्ये किशोरने एक बेहतरीन गाणे म्हटले आहे. मात्र ‘तुला किती पैसे देऊ?’ असे विचारले असता, किशोरने रायबाबूंच्या पायाला हात लावून वंदन केले आणि ‘एकही पैसा नको’, असे सांगितले. ‘पाथेर पांचाली’च्या निर्मितीसाठी राय यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि हा सिनेमाचा प्रकल्प रद्द करण्याचा त्यांचा बेत असतानाच, किशोरने त्यांना पाच हजार रुपये दिले होते.

बदमाश आणि लबाड निर्मात्यांकडून आपले रास्त मानधन कसे वसूल करायचे, याचे तंत्र मात्र त्याच्याकडे होते। ‘खैके पान बनारसवाला’ हे गाणे गाताना किशोरने प्रत्यक्षात पान खाल्ले होते आणि अधूनमधून तो ते थुंकत होता. या गाण्यातला जो ढेरपोट्या आहे, तो माटुंग्याच्या ‘सिटीलाइट’ सिनेमाच्या लगतच्या गल्लीत राहायचा आणि तिथे तो मला भेटला होता. आपल्या सिनेमात छोटी भूमिका करण्यास नकार दिल्यामुळे किशोर अमिताभवर नाराज झाला होता. किशोर, तूसी ग्रेट हो!-

साभार
हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT