भुले बिसरे गीत,विविध भारती पंच रंगी प्रोग्राम, ला बघता बघता 66 वर्शे पूर्ण झाली
मुंबई
प्रतिनिधि
विविध भारतीची स्थापना होऊन ( ‘आप सुन रहे है, विविध भारती का पंचरंगी प्रोग्रॅम’) बघता बघता 66 वर्षे झाली. आजही विविध भारतीवरील कार्यक्रम खूप छान असतात. अगदी आजच पद्मा तळवलकर यांचा ‘संगीत सरिता’ आहे. विविध भारतीचे निवेदक आजही अतिशय चांगले वाटतात.
त्यांच्या बोलण्यात ऋजुता, सुसंस्कृतपणा आणि उत्तम कलाभिरुची जाणवते. ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली 1923 मध्ये रेडिओ सिलोनचे प्रक्षेपण सुरू झाले. मात्र 1952 मध्ये कोलगेट, लिफ्टन, सिबा गायगी या कंपन्यांचे प्रायोजकत्व प्राप्त करून सिलोनवर लिफ्टनके सितारें, बिनाका गीतमाला असे अनेक कार्यक्रम सुरू झाले.
मी लिहिलेल्या ‘जलसाघर’ या पुस्तकाचे प्रकाशन सुमारे 30 वर्षांपूर्वी अमीन सायानी, पुष्पाताई भावे आणि मंगेश पाडगावकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यानिमित्ताने झालेल्या भेटीत अमीनभाईंनी रेडिओ सिलोनच्या, बिनाकाच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या. बिनाका हिट झाल्यानंतर ऑल इंडिया रेडिओला देखील आपल्या शैलीत बदल करावा लागला. त्यावेळी नभोवाणीमंत्री बाळकृष्ण केसकर हे शास्त्रीय संगीतालाच महत्त्व देत असत.
फिल्मी गाण्यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन ‘ही कसली गाणी!’ असा तुच्छतावादी होता. परंतु 1950 चे दशक हे चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग समजले जाते. या पार्श्वभूमीवर स्पर्धा आणि एकूण बदलते वातावरण लक्षात घेऊन ‘विविध भारती’ सुरू करण्यात आली. त्यावर जयमाला, छायागीत, भूलेबिसरे गीत, संगीत सरिता यासारखे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. शिवाय ‘हवामहल’ सारखा कार्यक्रम ( त्याची सुरुवातीची टीम आजही कानात गुंजत असते) अत्यंत लोकप्रिय झाला होता.
1957 सालीच गीतकार पं.नरेंद्र शर्मा यांच्या प्रेरणेने ऑल इंडिया रेडिओचे नामांतर ‘आकाशवाणी’ असे करण्यात आले. पंडितजींनी काय सुरेख नाव ठेवले आहे? विविध भारतीवर फर्माईशी गीतांचे कार्यक्रम राजनंदगाव, झुमरीतलैयापर्यंत पोहोचले! मी आजही सकाळी विविध भारतीवरील ‘भूलेबिसरे गीत’ ऐकतो. जवानांसाठी सुरू केलेला ‘जयमाला’ हा कार्यक्रम खूपच कल्पकपणे सादर केला जात असे व जातो. एकेकाळी दिलीपकुमार, देव आनंद, राजकपूर, मनोजकुमार, धर्मेंद्र, वहिदा, बलराज सहानी यांच्यासारखे अनेक कलावंत हा कार्यक्रम सादर करणार असल्याचे कळताच, रेडिओशी कान देऊन बसल्याचे आठवते.
ज्यावेळी केवळ रेडिओ हे एकमेव माध्यम होते, तेव्हादेखील श्रोत्यांच्या पसंतीवरून गाणी सादर करण्याचा इंटरॲक्टिव्ह प्रयोग त्या काळात करण्याची कल्पकता विविध भारतीने दाखवली होती. सर्व प्रसारमाध्यमे सरकारी व सरकारी प्रभावाखाली असतानाही, अनेक लेखक- कलावंत या माध्यमात कष्ट करून माध्यमास उभारी देत होते. राष्ट्रीय एकात्मतेच्या कामातही विविध भारतीने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विविध भारतीचे आम्ही ऋणी आहोत!-
साभार;
हेमंत देसाई