आज आचार्य अत्रे यांचा जन्म दिन आणि पू . भा . भावे यांची पुण्य तिथि,एक पुरोगामी विचारांचे तर दूसरे हिंदुत्ववादी विचारांचें
एकेकाळी आदेश विरुद्ध अत्रे हा वाद गाजला होता. ‘आदेश’ हे भावे यांचे साप्ताहिक. मात्र आज अत्रे यांच्याबद्दल दोन शब्द सांगावेसे वाटतात. ‘अत्रे यांनी मराठी भाषेला तेज दिले आणि मराठी माणसाला जागे केले’ असे उद्गार पु ल देशपांडे यांनी काढले होते.
अनेकजण जनातून वि स खांडेकरप्रेमी आणि मनातून अत्रेप्रेमी असतात, असेही ते गमतीने म्हणाल्याचे आजही आठवते. 1930 च्या दशकात मुंबई सरकारने क्रमिक पुस्तकांच्या कमिटीवर अत्रे यांची नेमणूक केली होती. अत्रे हे शिक्षण क्षेत्रातील ‘टी डी’ ही सर्वोच्च पदवी घेऊन लंडनहून आले होते.
नवोदित शिक्षकांच्या प्रवेशाला मार्गदर्शक म्हणून सरकारच्या एसटीसी या शिक्षण क्षेत्रातील पारंगततेसाठी, नवोदित शिक्षकांच्या प्रवेशाला मार्गदर्शक म्हणून अत्रे यांची निवड झाली आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचा दबदबा निर्माण झाला.
त्या काळात महाराष्ट्रात आणि मुंबई इलाख्यात कराचीपासून कारवार, चेन्नईपर्यंत आणि इंदौरपासून इचलकरंजीपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात अनेक परिषदा झाल्या, त्याचे अध्यक्षस्थान अत्रे यांनी भूषवले होते. क्रमिक पुस्तके कशी असावी तसेच शिक्षण कसे राष्ट्रीय व जीवनोपयोगी असावे आणि ते गुलामी करणारे कसे नसावे, याबद्दलचे प्रबोधन अत्रे यांनी केले.
पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांसाठीदेखील मुंबई सरकारने त्याकाळी अत्रे यांची नेमणूक केली होती. 1929 मध्ये आचार्य अत्रे यांची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी ओळख झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. कर्मवीरांच्या अंत्ययात्रेला दोन लाखांच्या जनसमुदायापुढे आचार्य अत्रे यांनीच श्रद्धांजलीपर भाषण केले आणि ते विलक्षण गाजले.
अत्रे यांच्या महात्मा फुलेंवरील चित्रपटात सुरुवातीला निवेदन करणारे कर्मवीर पडद्यावर दिसतात. 1929 सालच्या मे महिन्यात स्वातंत्र्याचे महाकवी शिवराम महादेव परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात पहिले मराठी साहित्य संमेलन भरले. शिवरामपंतांच्या ओजस्वी वाणीने संमेलन दणाणून गेले. सार्वजनिक जीवनातील त्यांचे हे शेवटचे भाषण होते.
त्यानंतर लवकरच शिवरामपंतांचे निधन झाले. या संमेलनात अत्रे यांच्या झेंडूच्या फुलाचे काव्यगायन झाले. या संमेलनाला न चिं केळकर हजर होते. 1946 मध्ये माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात साहित्य संमेलन भरले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची रूपरेषा मांडून, संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली.
आचार्य अत्रेंनी तसा ठराव मांडला व तो संमत झाला. काँग्रेसचे नेते गंगाधरराव देशपांडे, शंकरराव देव, केशवराव जेधे यांनी या ठरावाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याला तिच्या प्रारंभिक खर्चासाठी आचार्य अत्रे यांनी स्वतः शंभर रुपयांची देणगी जाहीर केली. अत्रे यांच्या पुढाकाराने देव, जेधे, माडखोलकर, श्री शं नवरे, प्रा पोतदार यांची संयुक्त महाराष्ट्र समिती आचार्य अत्रे यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.
‘बेळगाव महाराष्ट्राचे हृदय आणि मुंबई मस्तक आहे’ असे म्हणून आचार्य अत्रे सभा जिंकत व गाजवत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पूर्णतः बुडून गेलेल्या आचार्य अत्रे यांच्या अद्वितीय कामगिरीबद्दल प्रत्येक मराठी माणसाला कृतज्ञताच वाटत राहील. आज आचार्य अत्रे हयात असते, तर केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाबद्दल त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली असती. आचार्य अत्रे यांना मानाचा मुजरा! थोर साहित्यिक पु भा भावे यांनाही आदरांजली.-
संवाद
हेमंत देसाई