शेतक-यांना जमिन मोबदल्यासाठी लाच मागणारा अभियंता एसीबी द्वारे रंगे हाथ पकडून गजाआड !
प्रतिनिधि.
जळगाव, भूसंपादनात शेतजमिनी गेलेल्या शेतक-यांना मोबदला देण्यासाठी लाच मागणा-या जळगावातील तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश हनुमंत सावंत यांना 4 लाख 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
‘गिरणा’ या त्यांच्या सरकारी निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
एसीबीचे डीवायएसपी पराग सोनवणे यांच्या पथकाने बंगल्यात सापळा रचला.
रात्री ८.३० वाजता सावंत यांना तक्रारदाराकडून ४ लाख २५ हजार रुपये घेताना पकडण्यात आले.
त्यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक केली आहे.
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणासाठी शेतजमिनी संपादित केलेल्या एकूण ११० शेतकऱ्यांशी संबंधित हे प्रकरण आहे.
या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला कमी मिळाल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तापी पाटबंधारे महामंडळाने शेतकऱ्यांना व्याजासह ३ कोटी १३ लाख रुपयांचे बिल अदा करावे, असा आदेश न्यायालयाने दिला.
३ कोटी १३ लाख रुपयांच्या दोन टक्केप्रमाणे ४ लाख २५ हजार रुपयांची लाच सावंत यांनी मागितली होती.
वकिलामार्फत सावंत यांनी १ लाख रुपयांची लाच यापूर्वी घेतली होती.
उर्वरित ४ लाख २५ हजार रुपयांची लाच बुधवारी रात्री ८.३० वाजता सावंत यांच्या ‘गिरणा’ या निवासस्थानी दिली जाणार होती.
तत्पूर्वी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.