शिवानी ने स्वतः पत्र लिहून कट रचला होता !

images (22)

प्रतिनिधि.

मुंबई आणि पुण्याचे ATS, GRP आणि RPF यांचा कालचा संपूर्ण दिवस एका ‘रचलेल्या’ कटाची उकल करण्यात गेला.
हा कट रचला होता शिवानी भिंगार्डे नावाच्या दादरमध्ये राहणाऱ्या एका मुलीने.
काय केलं नेमकं तिनं की इतक्या पोलीस यंत्रणेला तिनं हलवलं हे वाचणं रोचक आहे !

शुक्रवारी सकाळी अत्यंत गर्दीच्या वेळी शिवानी भिंगार्डे (२४) हिने दादर रेल्वे स्थानकावर गस्तीवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कॉन्स्टेबल्सना – अशोक कुमार आणि धीरज कुमार यांना एक निळ्या रंगाचं पाकिट दिलं.
तिला ते ब्रिजवर सापडल्याचं तिनं सांगितलं.

पोलिसांनी तिला स्टेशनमास्तरकडे जायला सांगितलं तसं तिनं तिला वेळ नसल्याचं सांगत पाकिट तिथंच बाकड्यावर ठेवून दिलं आणि पोलिसांना म्हणाली, ‘तुम्हाला हवं तर तुम्ही ते उघडून पाहू शकता.’
कॉन्स्टेबल्सनी ते पाकिट उघडून पाहिलं तर आत एक १०० रुपयांची नोट आणि एक चिट्ठी होती.
चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘भाई (छोटा शकील) ने जो पाकिस्तानसे आदमी इंडिया में भेज दिये हैं, उनसे मुंबई और पुणे में बडा धमाका करने का प्लान बनाने के लिये मुझफ्फर शाह पुणे से बॉम्बे आने वाला हैं. आगे क्या करना हैं, कैसे करना हैं, वो मुझफ्फर बतायेगा. भाई मुझफ्फर के कॉन्टॅक्ट मे हैं.

तुम सब तैयार रहो धमाके के लिये.’ या निरोपासह मुझफ्फरचे तीन मोबाईल क्रमांकही लिहिले होते.
चिठ्ठी वाचताच कॉन्स्टेबलची दाणादाण उडाली.
रेल्वे पोलीस फोर्स (RPF), गव्हर्नमेंट पोलीस फोर्स (GRP) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) कामाला लागले.

चिठ्ठीत लिहिलेला ‘अतिरेक्यांचा म्होरक्या’ मुझफ्फर आणि ती पाकिट देणारी मुलगी या दोघांचा पोलीस शोध घेऊ लागले.

दादर स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी शिवानी आणि त्या RPSF कॉन्स्टेबल्समधील २० सेकंदाचं संभाषण झालेलं पाहिलं, त्यानंतर ती दादरच्या पश्चिम दिशेने बाहेर पडली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी आधीचे सीसीटीव्ही फुटेज शोधले तेव्हा कळलं की ती दादर ते परेल दररोज प्रवास करते.
दुसरीकडे ATS ने चिठ्ठीतले मोबाईल क्रमांक तपासल्यावर कळले की ते मोबाईल क्रमांक वापरणारी व्यक्ती मुंबई आणि पुणे ये-जा करते.

शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांना मोबाइल क्रमांकावरून मुझफ्फर पुण्यात असल्याचे कळले आणि त्यांनी त्याला कोथरूडमधून ताब्यात घेतले.
गोंधळलेला मुझफ्फर हा सर्व प्रकार काय आहे माहित नाही, आपला बॉम्बच्या धमकीशी काही संबंध नाही असे वारंवार सांगत होता.
जेव्हा पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा त्याने शिवानीला पटकन ओळखले आणि तिच्याशी प्रेमसंबंध होते असे सांगितले.

शनिवारी शिवानी तिच्या ऑफिसच्या वेळेत दादर स्थानकात येताच साध्या वेशातल्या RPF नी तिला ताब्यात घेतले. GRP नी तिची कसून चौकशी केली.
काही वेळानंतर तिनंच ती चिठ्ठी लिहिल्याचं कबूल केलं. शिवानी आणि मुझफ्फर रत्नागिरीच्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्यात प्रेम झालं. पण अलिकडेच मुझफ्फरचं लग्न अन्य एका मुलीशी झालं.
लग्न होऊनही तो शिवानीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत त्रास देई. तिला त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते.

दोन दिवसांपूर्वी त्याने तिला मारहाणही केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी शिवानीने हा कट रचला.
सध्या शिवानी मुंबई एटीएसच्या ताब्यात तर मुझफ्फर पुणे एटीएसच्या ताब्यात आहे. कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, पण चौकशी सुरू आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT