देखना आणि दमदार विनोद खन्ना हा सिडनेहेम कॉलेज चा कॉमर्स स्टूडेंट,त्या विषई इतर खास

मुंबई

वरिष्ट पत्रकार

विनोद खन्ना सिडनेहॅम कॉलेजचा कॉमर्स विद्यार्थी. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर मी त्याचा पहिल्याप्रथम ‘मेरे अपने’ हा चित्रपट बघितला. तो तेव्हाच रिलीज झाला होता. त्यात विनोद खन्ना विद्यार्थ्यांचा गॅंग लीडर बनून छेन्नूला असा काही आवाज देतो की बस्स रे बस्स!

शर्टाच्या बाह्यांच्या वळकट्या केलेल्या. दणकट आणि देखणा विनोद. तो पारंपारिक स्टाईलबाज हिरोप्रमाणे नव्हता. विनोदचा चेहरा हळवे भाव व्यक्त करतो, तेव्हा त्याचा आवाजही तितकाच हळवा होतो.. ‘कोई होता जिसको अपना’ हे गाणे दिग्दर्शक म्हणून गुलजारने खूप छानपणे घेतले आहे. ‘मेरे अपने’ पूर्वी आलेला ‘मन का मीत’ हा चित्रपट मी नंतर सातारला बघितला. तो कमालीचा बकवास चित्रपट होता आणि त्यात सुनील दत्तचा भाऊ सोमदत्त हा हिरो होता. सुनीलने चित्रपट निर्माण केला होता, म्हणून त्याने भावाला संधी दिली. त्याला बघणे हा अत्याचार होता. त्यात विनोद खलनायक होता. पूरब और पश्चिम, सच्चा झूठा, आन मिलो सजना, मस्ताना सर्व चित्रपट मी बघितले आहेत. तोपर्यंत त्याला नाव असे नाव मिळाले नव्हते.

‘मेरा गाँव मेरा देश’मध्ये डाकूच्या भूमिकेत विनोद मस्तपैकी शोभला. पुण्यात विजय टॉकीजबाहेर बॅनरवर विनोदचे मोठे बॅनर लागले होते. कच्चे धागे आणि मेरा गाँव हे दोन्ही माझा आवडता दिग्दर्शक राज खोसलाचे चित्रपट. दोन्हींत तो डाकू होता. ‘जमीर’मध्ये विनोदची अशाच प्रकारची भूमिका होती. ‘हम तुम और वो’ या चित्रपटात ‘प्रिये प्राणेश्वरी’ हे किशोरचे धमाल गाणे पडद्यावर विनोद म्हणतो. हा चित्रपट सस्पेन्स होता आणि तो मी पुण्यात वसंत टॉकीजला 1971 साली बघितला होता.

मात्र गुलजारच्या ‘अचानक’ने विनोदला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यातले विनोदचे केवळ धावणे बघण्यासारखे आहे… ‘परवरिश’ या मनमोहन देसाईच्या चित्रपटामुळे विनोदला बॉक्स ऑफिसवर प्रथमच इतके यश मिळाले. बिग बजेट फिल्म्समध्ये त्याचा प्रवेश झाला. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ ने दणदणीत यश मिळवले.

पण तो चित्रपट आधी अमिताभला ऑफर झाला होता. सुनील दत्तने ‘रॉकी’साठी आधी विनोद खन्नाला विचारले होते. त्याने नकार दिल्यानंतर संजय दत्तला घेतले. सुनील दत्तच्या ‘डाकू और जवान’ या भयानक चित्रपटातही विनोद होताच! राज खोसलाच्या ‘प्रेमकहानी’ मध्ये पठाणाच्या रोलमध्ये विनोद खन्ना शोभून दिसला.

1987 ते 94 या काळात विनोद खन्ना सेकंड हायेस्ट पेड हिंदी ॲक्टर होता. सलमानच्या ‘दबंग’ मध्ये तो होता. तेव्हा विनोद म्हणाला होता की, आजकाल हिरोच्या बॉडीवर जास्त लक्ष दिले जाते. खास करून त्याच्या सिक्स पॅक ॲब्सवर. आमच्या काळात अनेकांच्या तब्येती चांगल्या होत्या, पर हमने ये सब दिखाया नहीं’आन मिलो सजना’ मध्ये राजेश खन्नाकडून विनोद मार खातो, हे मोठे विनोदी वाटले! सुनील दत्तच्या ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात विनोदची भूमिका नकारात्मक आहे.

‘कालिया’ चित्रपटाचा ओरिजनल चॉईस विनोद खन्ना होता, नंतर त्याच्या जागी अमिताभची निवड करण्यात आली. अरुणा विकासचा ‘शक’ अतिशय उत्तम चित्रपट. खोसलाच्या ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ मधील विनोदची व्यक्तिरेखाही खूप सुरेख. नूतनसमोर टिकाव धरून राहणे सोपे नव्हते. ते विनोदने करून दाखवले. इंकार, इन्साफ, जुर्म, चाँदनी, सत्यमेव जयते असे अनेक चांगले चित्रपट त्याने केले.

एकाच वेळी डाकूच्या तसेच पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत विनोद शोभून दिसायचा. विनोदचा मुलगा राहुल इंग्रजी चित्रपट व सीरिअल्समध्ये काम करतो. तो उत्कृष्ट अभिनेता आहे आणि दुसरा अक्षय हा तर माझा लाडकाच अभिनेता आहे. पण खुद्द विनोदनेही हॉलीवूडमध्ये प्रयत्न करायला हवा होता, असे मला वाटते. कारण बॉलीवूडने त्याचा नीट उपयोग करून घेतला नाही. गुलजारने ‘मीरा’ या चित्रपटात त्याच्याकडून सुरेख काम करून घेतले. पण ऐतिहासिक, पोशाखी, युद्धपटांत विनोद शोभून दिसला असता. त्याला असे चित्रपट क्वचितच मिळाले. त्याच्या काळात सिनेमात व्यावसायिक चौकटीत प्रयोग फार कमी व्हायचे.

त्यामुळे पठडीबद्ध चित्रपटच वाट्याला येत असत. याला विनोदचाही नाईलाज होता. उद्योगपती शरयू दप्तरी यांची कन्या कविता ही विनोदची पत्नी दुसरी पत्नी. त्याची पहिली पत्नी गीतांजली. विनोदला एकदा एनएफडीसीच्या एका कार्यक्रमात सुमारे चाळीस, बेचाळीस वर्षांपूर्वी भेटायचा योग आला होता. त्यानंतर शिवाजी मंदिरात मराठी नाटक बघण्यासाठी विनोद कविताबरोबर आला होता. तो माझ्या शेजारीच बसला होता. वयाच्या पन्नाशीनंतरही अतिशय बांधेसूद आणि चांगला दिसत होता. फार लवकर गेला तो! आज विनोद खन्नाचा जन्मदिन. म्हणून त्याच्या या काही आठवणी जागवल्या.

-हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT