कोंकण ची शान आहे आड़ीवरे चे तावड़े भवन; उद्धव ठाकरे
रत्नागिरी
प्रतिनिधि
आडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान- उद्धव ठाकरे
रत्नागिरी : आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवन हा टोलेजंग वाडा म्हणजे कोकणची शान आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांची कोकणात गरज आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तावडे भवन आणि मंडळाचे कौतुक केले. तावडे भवन चे शिल्पकार ज्येष्ठ वास्तुविशारद संतोष तावडे यांचेही विशेष कौतुक याप्रसंगी केले. निमित्त होते ठाकरे यांच्या कोकणच्या दौऱ्याचे.
सिंधुदुर्गमधून राजापूरमार्गे रत्नागिरीत येताना आडिवरे येथे ठाकरे व पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी तावडे भवनला आवर्जून भेट दिली. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आमदार वैभव नाईक, तसेच उपाध्यक्ष सुहास तावडे, अजय तावडे (विलये), व्यवस्थापक निशांत लिंगायत, रवी गुरव आदी मंडळी उपस्थित होती. तावडे वाडा २०१७ मध्ये उभारण्यात आला. कोकणच्या लाल चिऱ्यापासून सौंदर्यपूर्ण वास्तू उभी राहण्यामागे वास्तुविशारद संतोष तावडे यांचे योगदान होते.
या वास्तुची वाहवा महाराष्ट्रात सर्वत्र होत असून पर्यटक वारंवार या वाड्याला भेट देत असतात. याची माहिती असल्यामुळे ठाकरे यांनी तावडे वाड्यास भेट दिली. तावडे कुटुंबीयांचा कुलस्वामी सप्तकोटेश्वराच्या मूर्तीचेही दर्शन ठाकरे दांपत्याने या वेळी घेतले. या मूर्तीची आखीव रेखीव रचना आणि मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव बोलके असल्याने ही मूर्ती त्यांना खूपच आवडली.
राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे. कोकणमधून बाहेरगावी गेलेले तावडे कुटुंबिय पुन्हा आपल्या गावात येतात. त्यांच्यासाठी तावडे भवन बांधले. ही इमारत जांभ्या दगडात व राजस्थानी वाड्याप्रमाणे केली आहे. विशिष्ट पद्धतीने दगडावर दगड लावून उभारलेल्या कमानी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याबद्दलही ठाकरे यांनी माहिती घेत तावडे हितवर्धक मंडळाचे कौतुक केले.
तावडे वाड्याचा दुसरा टप्पा लवकरच यासंदर्भात तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे आणि सरचिटणीस सतीश तावडे यांनी ठाकरे दांपत्याच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, तावडे वाड्याचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सप्तकोटेश्वराचे छोटेखानी मंदिर उभारण्यात येईल.
तावडे वाड्याला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून या दुसऱ्या टप्प्यात पर्यटकांसाठी सुविधा म्हणून खोल्या व बागेची निर्मिती केली जाणार आहे. कोकणात याच ठिकाणाहून जाणारा सागरी महामार्ग व अन्य माहिती घेऊन, दूरदृष्टी ठेवून वास्तुविशारद संतोष तावडे यांनी या तावडे वाड्याची सुरेख निर्मिती केल्याबद्दल त्यांचेही कौतुक दिनकर तावडे यांनी केले.