आज 15ऑगस्ट, याच दिवशि 2019 ला अभिनेत्री विद्या सिन्हा आपल्यातुन फार लवकर निघून गेली
विद्या सिन्हा ची आज पुण्यतिथि
अलीकडच्या काही वर्षांत टीव्ही सीरियल्समध्ये ती दिसायची. सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड” मध्ये ती होती. पण आपल्याला ती आठवते ती रजनीगंधा, छोटीसी बात, पती पत्नी और वो, मुक्ती अशा चित्रपटांमुळे. मी पुण्यातच राहत असताना 1974 साली तिचा ‘राजाकाका” हा अत्यंत फालतू चित्रपट पाहिला होता.
सुरुवातीला असे मिळतील ते चित्रपट स्वीकारावेच लागतात. पण त्यानंतर लगेच बासू चटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ मधून विद्याने सहजस्फूर्त आणि नैसर्गिक अभिनयाचा आविष्कार घडवला. ‘पती पत्नी और वो’ मधून विनोदी अभिनयाचे दर्शन घडवले, तर ‘इन्कार’सारख्या थ्रिलरमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली.
विद्याचे वैशिष्ट्य म्हणजे लग्नानंतर अनेक नायिका करियर सोडून देतात. विद्या लग्नानंतर या क्षेत्रात आली! पूर्वी कोलगेट, खटाव फॅब्रिक्स, लिप्टन चहा यांच्या ऍडमध्ये मॉडेल म्हणून तिला पाहिल्याचं आठवते. विद्याचे वडील राणा प्रताप सिंग यांनी देव आणि सुरय्या यांना घेऊन विद्या व जीत हे चित्रपट काढले होते. तर आजोबा मोहन सिन्हा यांनी तर तीस-बत्तीस चित्रपट निर्माण केले.
मदन पुरी आणि जीवनला त्यांनीच संधी दिली. मधुबाला हे स्क्रिननेम मोहनबाबूंनीच बेबी मुमताजला दिले. लग्नानंतर विद्याला सिनेमात काम करावं असं वाटू लागलं, पण नवऱ्याचा विरोध होता. मला परवानगी दिली नाही तर मी घराबाहेर पडेन असं म्हणण्याचं तिने धाडस दाखवलं. बासू चॅटर्जींनीच तिला अभिनय, लाइटिंग, कॅमेरा टेक्निक हे सगळं शिकवलं.
रजनीगंधा केवळ दोन लाख रुपयात बनला होता. पण काय चित्रपट होता! अमोल पालेकर आणि तिची मैत्री शेवटपर्यंत टिकून होती. मला आठवतं, ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटात विद्याला राज कपूरने नायिकेची ऑफर दिली होती.ती नाकारल्याबद्दल विद्याला शेवटपर्यंत पुढे पश्चात्ताप होत राहिला. मोहन सिंन्हा यांच्या ‘दिल की रानी’ या 1947 सालामधील चित्रपटात राजने काम केले होते.
पृथ्वीराज कपूर यांनी मोहनबाबूंच्या ‘श्रीकृष्ण अर्जुन युद्ध’ या 1945 च्या चित्रपटात भूमिका केली होती. नासिर हुसेन यांच्या एका चित्रपटात विद्याला दिलीपकुमारबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती पण तो चित्रपट प्रत्यक्षात आलाच नाही.
मुक्ती, पती पत्नी और वो आणि तुम्हारे लिये या चित्रपटात विद्याने संजीवकुमारबरोबर काम केले. संजीवकुमार अगदी साधा होता. आपण मोठे हिरो आहोत असे मिरवायचा नाही. त्यामुळे विद्या व त्याचे चांगले जमले. विद्याला उत्तमकुमारसारख्या अभिनेत्याबरोबर ‘किताब’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. विद्याने सिंहासन बत्तीशी आणि दरार सारख्या टीव्ही सिरियल्स निर्माण केल्यां ‘बिजली नावाचा मराठी चित्रपट तिने बनवला आणि एक गुजरातीपटदेखील. विद्याच्या पहिल्या पतीचे अकाली निधन झाले आणि काही वर्षांनी तिने दुसरा विवाह केला.
त्यात तिला वाईट दिवसाला सामोरे जावे लागले. काही वर्षे ती अभिनयापासून दूरही राहिली. या गोष्टीचीही तिला खंत वाटायची. मी नेहमी माटुंग्याला जातो आणि एडनवाला रोड, किंग्ज सर्कल, फाईव्ह गार्डन या परिसरात रमतो. यापुढे मी तिथे जेव्हा जाईन, तेव्हा तेव्हा मला माटुंग्यातील राहणाऱ्या विद्या सिन्हाची आठवण येत राहील.
संवाद:
हेमंत देसाई