छोटी सी ये जिंदगानी,दिल जलता है तो जलने दे,१९४१साली मुकेश हीरो फिल्म मद्दे केली स्वत हीरो ची भूमिका

एडमिन

प्रत्येक आवाजाचे एक व्यक्तित्व असते आणि त्या आवाजाची व्यक्ती विशिष्ट गाणी अधिक चांगल्याप्रकारे गाऊ शकते. मुकेशच्या आवाजाची जातकुळीच वैशिष्ट्यपूर्ण होती.
मुकेश म्हणजे पार्श्वगायन क्षेत्रातील अटलबिहारी वाजपेयीच! अजातशत्रू. मुकेश हा सभ्य व सुसंस्कृत माणसाचा रुपेरी पडद्यावरील आवाज होता.
मुकेशची दर्दभरी गीते अधिक लोकप्रिय झाली, परंतु त्याने आनंदी, खेळकर,
उडती तसेच ग्रामीण बाजाची गाणीही फार सुरेख पद्धतीने म्हटली आहेत. ‘
रूढीग्रस्त आणि परंपराबद्ध भारतीय समाजात, वास्तव जीवनात यशस्वी प्रेमापेक्षा असफल प्रेमकहाण्यांची संख्या अधिक होती. शिवाय ज्यांना आपल्या मनातील प्रेम व्यक्त करता येत नव्हते,
अशा लोकांच्या मनातील भाव आणि दु:ख मुकेशच्या आवाजात उत्कटपणे व्यक्त केले जात होते,’
असे एकदा ख्यातनाम मनोविश्लेषणतज्ज्ञ आणि विचारवंत सुधीर कक्कर यांनी म्हटले होते, ते खरोखरच पटण्यासारखेच आहे.
तरुणपणी मुकेश हा माझा सर्वात आवडता गायक होता.
चित्रपटगीतांची असंख्य बुकलेट्स मी तेव्हा जमवलेली होती आणि त्यातील गाणी मला तोंडपाठ असत.
अगदी शाळकरी वयापासून मी ती गाणी म्हणत असे.
माझ्या स्वरात ती ऐकून लोकांच्या वेदनेत भर पडत असे, हा भाग वेगळा.
असो! मुकेश गेल्यानंतर प्रचंड दु:ख होऊन मी ताबडतोब एक लेख लिहिला आणि आणि सहा किलोमीटर अंतर सायकलने पार करत,
तो पुण्यात स्वारगेटजवळ मुकुंदनगरमध्ये जाऊन, साप्ताहिक ‘मनोहर’चे संपादक दत्ता सराफ आणि किर्लोस्कर मासिकांचे मुख्य संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांना तो दिला. तेव्हा मी कॉलेजात होतो.
उभयतांना तो खूप आवडल्यानंतर, त्यांनी तो तात्काळ प्रसिद्ध केला. ही गोष्ट आहे 27 ऑगस्ट 1976ची.
मुकेशचे निधन झाले ते अमेरिकेत. अगोदर तो दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करत होता.
इतका मोठा गायक एकेकाळी काम तरी कुठे करत होता बघा!
मात्र तो जन्मजात गायक होता. श्रेष्ठ अभिनेता मोतीलालने एका विवाहसोहळ्यात मुकेशला गात असताना हेरले. गंमत म्हणजे, मुकेशला सिनेमात हीरो बनायचे होते.
1941 मध्ये ‘निर्दोष’ या चित्रपटात मुकेश हीरो आहे आणि त्यात त्याने पार्श्वगायनही केले. त्यानंतर काही चित्रपटांत त्याने भूमिका केल्या.
पुढे अगदी राज कपूरच्या ‘आह’ या चित्रपटात ‘छोटी सी ये जिंदगानी’ हे गाणे पडद्यावरही मुकेशच गायला.
मुकेश गोरा चिट्टा होता आणि दिसायला देखणा. राज कपूर त्याला ‘दूध का धुला’ असे म्हणायचा. मुकेश शास्त्रीय बंदिशी छान म्हणायचा.
मुकेशने स्वतः ‘अनुराग’ नावाचा चित्रपट निर्माण केला होता आणि त्याचे संगीतही दिले होते.
‘आनंद’ या चित्रपटात नायकाला सतत समोर मृत्यू दिसत असतो, त्यामुळे या चित्रपटात माझ्यासाठी माझा लाडका किशोर नको, तर मुकेशच हवा,
असा आग्रह राजेश खन्नाने धरला होता. हृषीदांना किशोर हवा होता.
एकदा नितीन मुकेशने एक किस्सा सांगितला होता. त्याने ‘आज मला कार हवी आहे’ असे म्हटल्यावर मुकेशने त्याला कारची चावी दिली.
नितीन कारने बाहेर जाऊन परत येत असताना बस स्टॉपवर त्याने वडिलांना पाहिले.
तेव्हा त्याने विचारले, ‘पप्पा, आप बसस्टॉप क्यूं खडे है?’ तेव्हा मुकेश म्हणाला,
अरे, तुला गाडी हवी होती ना? म्हणून मी बसने जातोय.’ इतका साधा आणि निरहंकारी.
‘संगम’ मधील ‘दोस्त दोस्त ना रहा’ या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले आणि मुकेशच्या गायनावर खूष होऊन जयकिशनने दुसऱ्या दिवशी एका दुकानात जी सर्व फुले होती,
ती सर्वच्या सर्व विकत घेऊन, ती मुकेशच्या घरी धाडली.
जयकिशन काय, मुकेश काय, शंकर काय, ही वेगळीच माणसे होती… कलाकार मनाची!
केवळ पैशाचा विचार न करणारी. शंकरला तर मी भेटलो देखील आहे. ‘
निर्दोष’ मधील मुकेशचे ‘दिल बुझा हुआ’ हे गाणे फार लोकांना माहिती नसेल.
मोतीलालने मुकेशला मुंबईला आणले आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे त्याने गाण्याचे थोडेबहुत शिक्षण घेतले.
‘दिल जलता है तो जलने दो’ हे मुकेशचे गाणे गाजले, हे सर्वांना माहिती आहे.
पण सहगलच्या या प्रभावातून तो हळूहळू बाहेर आला आणि मुकेशने स्वतःची एक शैली विकसित केली. त्यासाठी नौशादने त्याला मदत केली. मुकेशने साधारणतः तेराशे गाणी गायली.
मुकेशच्या स्वरात काळीज चिरुन टाकणारा दर्द होता. तारसप्तकातील मुकेशची गाणी कमी आहेत. ‘
संगीतसम्राट तानसेन’ मध्ये ‘झूमती चली हवा’ हे त्याचे सोहनी रागातील गाणे अतिशय भावपूर्ण आहे.
‘जाने कहां गये वो दिन’ या शिवरंजनी रागातील गाण्याशिवाय आपण ‘मेरा नाम जोकर’ ची कल्पनाही करू शकत नाही! कारण या गाण्यामुळेच या चित्रपटास अर्थ आणि परिपूर्णता मिळालेली आहे. मुकेशचा आवाज हा माझा आत्मा आहे,
असे राजकपूर म्हणायचा. परंतु राज स्वतः कमालीचा गायक होता.
त्याला संगीताचा जबरदस्त सेन्स होता आणि तो देखील उत्तम पार्श्वगायक होऊ शकला असता, असे मुकेश नेहमी म्हणत असे.
ज्यावेळी राजकपूर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होऊ लागला तेव्हाच, म्हणजे 1951साली ‘मल्हार’ हा चित्रपट मुकेशने निर्माण केला होता.
त्यात प्रीती सागरचे पिता मोती सागरने काम केले होते. शिवाय ‘मल्हार’ मध्ये अलीकडील काळात जिचे निधन झाले, ती शम्मी नायिका होती. असो.
हे विषयांतर झाले. मुकेशच्या अनेक गाण्यांमध्ये मला सर्वाधिक तीन गाणी आवडतात.
गुजरा जमाना बचपन का, आया है मुझे फिर याद वो जालीम,
हमने अपना सब कुछ छोडा प्यार तेरा पाने को आणि ओह रे ताल मिले नदी के जल में..
मुकेशशिवाय जगून बघता बघता पंचेचाळीस वर्षे झाली की हो!
साभार
हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT