पाहा ताशी 300 km.चिपी विमानतळ धावपट्टी तयार मालवण वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग विकासाच्या वाटेवर !

IMG-20180207-WA0033

प्रतिनिधी.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये हवाई वाहतुकीचा वाटा मोठा आहे.
ज्याज्या शहरांचे नाव हवाई वाहतुकीच्या नकाशावर आले त्यांचा विकास वेगाने झाल्याचे दिसते.
उद्योग, व्यापार आणि वाणिज्य विकासासाठी हवाई वाहतुकीचे महत्व अनन्यसाधारण आहे.
याचाच विचार करुन महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला.
त्याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे विमानतळ प्रस्तावित केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणे व पर्यटनाचा विकास करणे या दृष्टीकोनातून हा विमानतळ उभारण्यात येत आहे.
विमानतळाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प 274 हेक्टर जागेवर साकारत आहे.
जून 2018 पर्यंत सदर विमानतळ कार्यान्वीत करण्याचा प्रशासनाचा उद्देश असून, त्यादृष्टीने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद व 3.5 कि.मीची असून पहिल्या टप्प्यात २.५ कि.मी.ची धावपट्टी बांधून झाली आहे. तर उर्वरित 1 कि.मी.च्या धावपट्टीचे अस्तरीकरण बाकी असून, दळणवळण वाढल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ती पूर्ण करण्यात येणार आहे.
सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविता येणार आहे.
त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅँडिगची ही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी असणार आहे.

तर 10 हजार चौरस मीटरचे टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सुमारे 6 ते 180 प्रवासी क्षमतेची विमाने या ठिकाणी उतरु शकतात.
त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरचे कामही पूर्ण झाले आहे.

हा टॉवर विमानांना उतरण्यास व उड्डाणास मदत करतो.
तसेच विमानांना योग्य ती दिशा कळवण्याचे कामही हा टॉवर करतो. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत होत असलेल्या या प्रकल्पाचे काम आय.आर.बी.कडे सोपविण्यात आले आहे. यासाठी 521 कोटींचा निधी मंजूर आहे.
एकूणच या विमानतळाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे.

भविष्यातील लागणाऱ्या सर्व सोयींचा विचार करुन या विमानतळाची उभारणी केली जात आहे.
विमानतळ कु़डाळ पासून 25 कि.मी अंतरावर आहे.
तर सावंतवाडी पासून 110, मालवण पासून फक्त 15 कि.मी., तर वेंगुर्ले पासून 40 कि.मी अंतरावर आहे.
कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.
त्यापैकी या विमानतळास संलग्न असणारा सागरी महामार्ग कुंभारमाठ – परुळे – सातार्डा या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी सुमारे 25 कोटी खर्च अपेक्षित आहे.

तसेच जवळच्या कुडाळ शहराशी वेगवान वाहतुकीसाठी 38 कोटी खर्चाच्या कुडाळ पाट रस्त्याच्या रुंदीकरणाचा व दुरुस्तीचा प्रस्तावही आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत.

पण, हा जिल्हा हवाई वाहतुकीच्या नकाशावर आजून नाही.
या विमानतळ प्रकल्पामुळे जिल्हा हवाई वाहतुकीच्या नकाशावर येणार आहे.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाला अनन्य साधारण महत्व आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.

या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यंटकांमध्ये रेल्वे व रस्ते मार्गे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच हवाई मार्गे येणारे पर्यटक हे गोवा राज्याकडे जातात. पण, चिपीचे विमानतळ झाल्यानंतर थेट दिल्ली सारख्या महानगरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणे पर्यटकांना सोपे जाणार आहे.
त्यामुळे साहजिकच पर्यटनाच्या वाढीसाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे.
तसेच जिल्ह्यामध्ये आंबा, काजू, आणि मासळी यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.
सध्या देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड येथील आंब्याने मोठे नाव कमावले आहे.

पण, सध्या हा आंबा बागायतदारांना मुंबई येथील व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही.
कारण, येथील आंबा रस्तेमार्गे मुंबईच्या बाजारात नेला जातो आणि मग देशाच्या इतर भागात व परदेशात निर्यात केला जातो. विमानतळामुळे चिपी परिसरात कार्गो हब निर्माण होईल.
त्यामुळे आंबा देशातल्या व विदेशातील बाजारपेठेत थेट पाठविणे सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांना शक्य होईल. त्यामुळे आंब्याचा ताजेपणा व विशिष्ट चव राखणेही शक्य होणार आहे.

एकूणच आंबा बागायत दारांच्या उत्पन्नात यामुळे वाढ होणारच आहे, शिवाय स्थानिक व्यापाऱ्यांचाही चांगला फायदा होणार आहे.
सध्या मत्स्य खवय्यांची संख्या वाढत आहे.
समुद्रातील ताजे मासे मिळावेच अशी अनेक देशांतर्गत, खास करुन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश मधील अंतर्गत भागातील लोकांची मागणी असते. त्यामुळेच पर्यटकांचेही पाय मालवण, देवगड, विजयदुर्ग या भागाकडे वळतात. त्यांना रोजच्या जेवणामध्येही चविष्ठ मासळी हवी असते.

पण, रस्ते मार्गे अशी मासळीची वाहतूक शक्य होत नाही. मासळी हा नाशवंत माल आहे.
त्यामुळे तो जास्त काळ साठवता येत नाही. पण, हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ताजी मासळी देशाच्या अंतर्गत भागात पोहोचवणे शक्य होणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चांगला फायदा होणार आहे.

तसेच रोजगारवाढीची संधीही उपलब्ध होणार आहे.
त्याशिवाय विमानवाहतुकीची सोय झाल्यामुळे अनेक खासगी अस्थापना सिंधुदुर्गाकडे वळतील. त्यातून औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळेल.
सध्या असलेल्या अस्थापनांनाही त्यामुळे उर्जितावस्था प्राप्त होईल.
या सर्वांमुळे जिल्ह्यातील रोजगारात वाढ होऊन जिल्ह्याची अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होणार आहे.
सध्या सिंधुदुर्ग हा जमिनीवरील व जलमार्ग वाहतुकीने जोडलेला आहे.

तर चिपी विमानतळामुळे हा जिल्हा हवाई मार्गेही जगाशी जोडला जाणार आहे. मुंबई नंतर राज्यात अशा रस्ते, जलमार्ग व हवाई मार्गाने जोडला गेलेला सिंधुदुर्ग हा पहिलाच जिल्हा असणार आहे.
एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या विमानतळामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाला चालना मिळणार आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT